मुख्यमंत्र्यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणाऱ्या मदन शर्मांना राज्यपाल भेटणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. या प्रकरणामुळं भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. यानंतर आता मदन शर्मा हे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

मदन शर्मा कांदिवली इथं राहतात. माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली. यानंतर या प्रकरणी 4 शिवसैनिकांना अटक झाली आहे. त्यांना जामीन मिळाला आहे. यात 2 शाखाप्रमुखांचा तर अन्य 2 कार्यकर्त्यांचा समावेश होता.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजता इतर माजी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

या घटनेनंतर मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेनेची भूमिका मांडत शिवसैनिकांची पाठराखण केली.

संजय राऊत म्हणाले, “माजी नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा संतप्त आणि उत्स्फूर्त आहे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षानं या घटनेचं राजकीय भांडवल करावं हे दुर्दैवी आहे” असंही ते म्हणाले आहेत.