माढ्यात राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्याने भाजप ‘पेचात’

रोहन देशमुख की रणजितसिंह मोहिते-पाटील

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी माघार घेतल्यापासून अनेक नाट्यमय हालचाली घडत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळाले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनाच माढ्याची उमेदवारी मिळणार असे निश्चित मानले जात असताना आता सुभाष देशमुख यांच्या पुत्राचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. दरम्यान, आज माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  यांना लोकसभेची उमेदवारी दिली असून त्यांच्या नावाची घोषणा स्वतः शरद पवार यांनी बारामतीमध्ये केली असल्याने भाजप पेचात सापडल्याचे चित्र आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपात घेतल्याने माढा मतदारसंघात भाजपाची ताकद एकाच दिवसात दुप्पट झाली. त्यानंतर आता त्यांना तिकीट देण्यासाठी भाजपमध्ये टाळाटाळ केली जाऊ लागली आहे. अशातच भाजपचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाचे नाव माढा मतदारसंघासाठी आघाडीवर असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. रोहन देशमुख यांना भाजपची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक असून मोहिते पाटील यांना भाजपकडून रोखण्यात येऊ शकते. तसेच रणजितसिंह मोहिते पाटील यांना आगामी काळात विधानपरिषदेवर घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते.

दरम्यान, आज माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली असून त्यांच्या नावाची घोषणा स्वतः शरद पवार यांनी बारामतीमध्ये केली आहे. अशात संजय शिंदे यांच्या विरोधात भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांना उतरवते की रोहन देशमुखांना हे पाहण्यासारखे राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन देशमुख यांना माढ्याची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. तर अशा बातम्या माध्यमात झळकू लागल्याने मोहिते पाटील समर्थकांमध्ये चिंता अधिक वाढली आहे.