माढ्याचा तिढा : भाजपच्या रणनीतीत गनिमी कावा

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप मढ्यात कोणाला उमेदवारी देणार यावर रोज नवीन चर्चा नव्याने रंगत आहेत. शरद पवार यांनी घेतलेली माघार, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुत्राने केलेला भाजप प्रवेश आणि भाजपच्या संभाव्य उमेदवाराला मिळालेली राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी या सर्व घडामोडीमुळे माढा मतदारसंघ गाजला. अशा गाजलेल्या आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा मतदारसंघात भाजपने विजयी निशाण फडकवण्याचा निर्धार केला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे तेच या मतदारसंघातील भाजप उमेदवार असणार असा कयास सर्वांनी बांधला होता. मात्र, त्यांच्या प्रवेशाला दोन दिवस होतात तोपर्यंत माढा मतदारसंघाच्या उमेदवारी संदर्भात त्यांचे नाव मागे पडले आणि त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरु करण्यात आली. त्यांच्या नावाची चर्चा थांबवून भाजपने आता रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरु केली आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाची चर्चा भाजपने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या आधी पासूनच सुरू केली आहे.

भाजप वेगवेगळ्या नावाची चर्चा का करत आहे. तर यामागे भाजपचा गनिमी कावा असण्याची संभावना नाकारता येणार नाही. भाजप माढ्याचा आपला उमेदवार जाहीर करून विरोधकांना रणनीती आखण्याला सावध करू इच्छित नाही. त्यामुळे येणारे नऊ दिसव माढा मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत. तसेच भाजप आपला उमेदवार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधी देखील जाहीर करू शकते. त्याच प्रमाणे विरोधकांना कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा भाजप सध्या करत असणार आहे. अर्थात रोहन देशमुख, रणजितसिंह निंबाळकर याच्या नावाची चर्चा करून भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊ शकते. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यास तेच भाजपसाठी सक्षम उमेदवार होऊ शकतात असा देखील कयास राजकीय जाणकारांनी बांधला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मोडीत काढण्यासाठी भाजप विजयसिंह मोहिते पाटील यांना देखील मैदानात उतरवू शकते. माढ्याचा भाजप उमेदवार कोण असणार हे आता आगामी नऊ दिवसात समजणार आहे. तसेच भाजपचा उमेदवार कोण असणार यावरच जय पराजयाची गणिते ठरणार आहेत.