माढ्यात नाट्यमय घडामोडी ; काँग्रेसच्या आमदाराचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच सुरुवातीपासून नाट्यमय घडामोडी सुरु असलेल्या माढा लोकसभा मतदार संघात अजूनही नाट्यमय घडामोड़ी घडत आहेत. माढा लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना काँग्रेसच्या आमदाराने पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत भव्य कार्यकर्ता मेळाव्यात दिले. माण खटाव तालुक्यातील बोराटवाडी येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना गोरे म्हणाले की, ‘यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आपण काँग्रेसवर जरी नितांत प्रेम करीत असलो तरी आपल्या भागाला पाणी आणण्याच्या कामाची सुरुवात रणजित निंबाळकर यांच्या वडिलांनी केली आहे. असे म्हणत गोरे यांनी रणजित निंबाळकर यांच्या मागे राहण्याचे संकेत दिले आहेत.

यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना ‘ज्यांना राष्ट्रवादीला मतदान करावेसे वाटते त्यांनी हात वर करावा’ असे आवाहन केले. मात्र, यावेळी कोणीही हात वर केला नाही. त्याचवेळी रणजित निंबाळकर यांना मतदान करावंसं वाटतं त्यांनी हात वर करा असे आवाहन करताच सर्व कार्यकर्त्यांनी टाळया आणि शिट्ट्या वाजवत हात वर केले. अशा प्रकारे काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे संकेत यावेळी गोरे यांनी दिले.

दरम्यान, गोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी असल्याचे देखील राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.