‘व्हॅलेंटाईन-डे’ ला जन्मलेल्या मधुबालाला गुगलचा मुजरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लाखो-करोडो हृदयांची धडधड बनलेल्या मधुबाला हिचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीत झाला होता. १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे‘ म्हणून साजरा होत असला तरी मधुबाला यांना ‘हृदया’नेच दगा दिला, असे म्हणायला हरकत नाही. याच मधुबाला यांच्या जन्मदिवसांनिमित्ताने गुगलनेही त्यांच्या आठवणींना डुडलच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. या डुडलमध्ये मधुबालाचा कलरफुल फोटो दिसतोय. हा फोटो दिलीप कुमार यांच्यासोबतचा तिचा सुपरहीटच नाही तर ‘ऐतिहासिक’ सिनेमा ठरलेल्या ‘मुगल ए आझम’ या सिनेमातून घेतला गेलाय.

१९४९ मध्ये आलेल्या ‘महल’ सिनेमातलं ‘एक तीर चला, दिल पे लगा…’ हे गाणं लागलं आणि अनेकांना मधुबालाची आठवण आली नाही तरच नवल… मधुबाला यांचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी… आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी ‘बसंत’ या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या १४ व्या वर्षी १९४७ साली त्यांनी राज कपूर यांच्या ‘नील कमल’ सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून नाव मिळवले.

मधुबाला यांनी अभिनेते किशोर कुमार यांच्याशी विवाह केला होता. परंतु, आजारी पडल्यानंतर मात्र त्या एकाकी पडल्या होत्या. दोन महिन्यांतून एकदा किशोर कुमार त्यांची भेट घेण्यासाठी जात असत. मधुबाला यांच्या हृदयाला छेद होता. शस्त्रक्रियेनंतरही जास्तीत जास्त दोन वर्ष त्या जिवंत राहू शकतील, असे डॉक्टरांनीही सांगितले होते. आपल्या वाढदिवसाच्या सात दिवसानंतर २३ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

‘दिलीप कुमार : द सबस्टेन्स अ‍ँड द शॅडो’ या आपल्या आत्मचरित्रात दिलीप कुमार यांनी मधुबाला यांचा उल्लेख एक चांगली कलाकार आणि जीवनाविषयी आत्मियता असणारे एक जिंदादिल व्यक्तीमत्त्व असा केलाय. दिलीप आणि मधुबाला यांनी १९५१ मध्ये पहिल्यांदा तराना या सिनेमात काम केले होते. दिलीप-मधुबालाची जोडी प्रेक्षकांना भावल्यामुळे मुगल-ए-आजम या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान दिग्दर्शक के. आसिफ खूपच खुश होते. दिलीप यांच्याविषयी वाटणारे प्रेम मधुबालाने आसिफसमोरही व्यक्त केले होते. पण, याच दीर्घकाळ चाललेल्या या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान मधुबाला आणि दिलीप यांच्यातील नाते ताणले गेले होते.

त्या दिवसांच्या आठवणीत दिलीप लिहितात, ह्या आमच्या संबंधातला गोडवा निघून जात असल्याची चाहूल जेव्हा मला लागली तेव्हा आसिफने हे नाते पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न केले. ते मधुबालासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण करत होते पण भलं होवो मधुबालाच्या वडिलांचं ज्यांनी आमच्या होणाऱ्या लग्नाचा व्यावहारिक संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. दिलीपकुमार लिहितात, जेव्हा मुगल-ए-आझमचा प्रसिद्ध मोरपंखाचा सिन शूट होत होता तेव्हा तर दोघांमध्ये साधे बोलणंही बंद झालं होतं. या दृश्यात शूटींग दरम्यान जेव्हा आमच्या दोघांच्या ओठांदरम्यान केवळ ते मोरपंख होतं, तेव्हा आमच्यातल्या संभाषणाचा शेवट झाला होता. एव्हढंच काय आम्ही एकमेकांना दुआ-सलामही करत नव्हते हे दृश्य म्हणजे केवळ दोन पेशेवर कलाकारांचा अंदाज आणि कलेच्या प्रती समर्पणाचं प्रतीक आहे. ज्यामध्ये दोघांनी आपापले खाजगी वाद बाजूला ठेऊन दिग्दर्शकाच्या स्वप्नाला सत्यात उतरवले.
You might also like