बिहार सरकारचे मंत्री कपिलदेव कामत यांचे निधन, CM नीतीश म्हणाले – ‘न भरून येणार नुकसान’

पाटणा : वृत्त संस्था – बिहार सरकारचे मंत्री कपिलदेव कामत यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री उशीरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोविड-19 चा संसर्ग झाला होता आणि ते सुमारे एक आठवड्यापासून पाटणातील एम्समध्ये उपचार घेत होते. त्यांना अगोदरपासूनच किडनीचा त्रास होता आणि आता श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी कामत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पंचायत राज मंत्री कपिलदेव कामत यांच्या निधनानंतर आपल्या शोक संदेशात म्हटले की, स्वर्गीय कपिलदेव कामत जमीनीवर असलेले राजकीय नेते होते. ते कॅबिनेटमध्ये माझे सहकारी होते. ते एक कुशल प्रशासक आणि लोकप्रिय राजकीय नेते होते. त्यांच्या निधनाने मला व्यक्तीगतदृष्ट्या खुप दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

सीएम नीतीश कुमार यांनी म्हटले की, कोविड काळासाठी सध्या लागू दिशानिर्देशांतर्गत राजकीय सन्मानासह त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. कपिलदेव कामत जनता दल युनायटेडच्या प्रभावी नेत्यांपैकी एक होते आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे अतिशय निकटचे होते. मधुबनी जिल्ह्याच्या बाबूबरहीचे आमदार असलेले कामत नीतीश कॅबिनेटमध्ये पंचायत राज मंत्री होते. त्यांचे आरोग्य पहाता पक्षाने त्यांच्या ठिकाणी सून मीना कामत यांना बाबूबरहीमधून आमदार बनवले.