माधुरी दीक्षितच्या पुण्यातील लोकसभा निवडणूकीबाबतचे ‘ते’ वृत्त खोटे

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपाच्या तिकीटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, माधुरीच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. हे वृत्त खोटे आणि निराधार असल्याचे या  प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा पुण्यातून माधुरीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातमीमुळे पुण्यात आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. मात्र माधुरीच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळून लावत, ते खोटे असल्याचे म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह भाजपा संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितची तिच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चाही सर्वत्र रंगली होती. दरम्यान माधुरीने मात्र स्वत: यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवा उद्यापासून

कोल्हापूर : कोल्हापूरहून हैदराबाद आणि बेंगलोरसाठी उडान फेज टू अंतर्गत ९ डिसेंबरपासून रोज विमान उड्डाण घेणार आहे. त्यातून हैदराबाद-कोल्हापूर आणि बेंगलोर-कोल्हापूर अशी दैनंदिन विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती; मात्र हवाई परवाना मिळाला नसल्यामुळे विमानसेवा रद्द करण्यात आली होती.

तांत्रिक कारणामुळे विमानसेवेला परवानगी मिळत नसल्याने खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्ली इथे जाऊन नागरी उडानमंत्री सुरेश प्रभू आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन व्हीएफआर हा परवाना मिळावा, अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी हा परवाना देण्यात आला. त्यामुळे एटीआर ही ७२ आसनी विमान कोल्हापुरातून टेकऑफ करण्याचा मार्ग मोकळा झाला. ९ डिसेंबरपासून अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून सुरळीतपणे ही सेवा सुरू राहील, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. या विमानसेवेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

या हवाई सेवेसाठी ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यात्रा डॉट कॉम, मेक माय टिप आणि एअर इंडिया डॉट इन या वेब पोर्टलवर बुकिंग करता येणार आहे. लवकरच कोल्हापूर-तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरू होईल. तसेच उडान फेज थ्रीसाठी हवाई मार्ग निश्चिती होणार आहे. त्यामध्ये एअर डेक्कनचा करार रद्द करून, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नव्या एअर लाईन्सकडे देण्यासाठी, विमानतळ प्राधिकरण गांभीर्याने विचार करत आहे. तसेच कोल्हापूरहून अहमदाबाद आणि गोव्यासाठी हवाई सेवा सुरू करण्याला प्राधिकरण अनुकूल असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रांच्या कार्यालयांवर ईडीची छापेमारी