बोअरवेलमध्ये पडला 3 वर्षाचा चिमुकला

पोलीसनामा ऑनलाईनः तीन वर्षाचा चिमुकला खेळता- खेळता बोअरवेलमध्ये पडल्याची (3-year-old-falls-borewell) घटना मध्य प्रदेशच्या निवारी तालुक्यात समोर आली आहे. चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुलाला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून सेनेचीही (army-undertakes-rescue) मदत घेतली आहे.

प्रल्हाद कुशवाह असे या तीन वर्षाच्या चिमुकल्याचे नाव असून तो निवारीतील सेतपुरा गावचा रहिवासी आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील चिमुकल्यासाठी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. मुलगा सुखरुप बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ओरछाच्या सेतपुरा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्या प्रल्हादला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत सेनाही बचावकार्यात सहभागी झाली आहे. लवकरच प्रल्हादला सुखरुप बाहेर काढण्यात येईल, अस ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ईश्वर मुलाला दीर्घायुष्य प्रदान करो, आपण सगळेच यासाठी प्रार्थना करू असे देखील मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज सुरुवातीला येत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मुलाला बोअरवेलमधून सुखरुपरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी प्रशासनाच्या सर्व टीम्स वेगाने कार्य करत आहेत.