मध्य प्रदेशात ट्रकला बसची धडक, महाराष्ट्रातून जाणारे 8 मजूर जागीच ठार तर 50 जखमी

गुना : वृत्त संस्था – मध्य प्रदेशातील गुना कँटोंमेंट भागात बसने ट्रकला दिलेल्या धडकेत ट्रकमधील ८ कामगारांचा जागीच मृत्यु झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार महाराष्ट्रातून ट्रकमधून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी जात होते.

गावी जाण्यासाठी आवश्यक ती कोणतीही सुविधा उपलब्ध न झाल्याने या कामगारांनी शेवटी ट्रकचा आधार घेतला होता.  ट्रकमधून हे सर्व ५८ हून अधिक लोक प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर प्रदेश परिवहन विभागाच्या बसची ट्रकला धडक बसली. त्यात ८ कामगार ठार झाले आहेत. हे आठही कामगार उत्तर प्रदेशातील आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.