एका नवरदेवाला 2 नवर्‍या, एकीसोबत Love मॅरेज तर दुसरीशी ‘अरेंज्ड’ !

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था –  मध्य प्रदेशातील बैतूल येथे एक अनोखे दृश्य पहायला मिळाले, ज्यामध्ये एका मांडवात एका वराने दोन वधूंसह विवाह केला. त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक वर दोन वधूंसोबत फेरे घेताना दिसत आहे.

हा व्हिडिओ बैतूलच्या घोडाडोंगरी तहसीलच्या सलैया गावचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी एका तरूणाने आपल्या दोन पत्नींसह मांडवात सात फेरे घेतले. या लग्नात वधू-वराच्या कुटुंबांसह गावातील लोकांनीही हजेरी लावली. असे पहिल्यांदाच झाले की, एका मांडवात वर एक आणि वधू दोन होत्या.

वराने दोन्ही वधूंसह एकत्र सात फेरे घेतले आणि लग्नाच्या सर्व विधी एकत्र पूर्ण केल्या. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सांगितले जात आहे की, सलैया गावचा आदिवासी तरूण संदीप याने होशंगाबाद जिल्ह्यातील सुनंदा या तरुणीशी आणि घोडाडोंगरी तहसीलच्या कोयलारी खेड्यातील आणखी एक मुलगी शशीकलाशी लग्न केले आहे.

वास्तविक हा तरुण भोपाळमध्ये आयटीआय शिकत होता, याच दरम्यान होशंगाबाद जिल्ह्यातील सुनंदा या तरुणीशी त्याची मैत्री झाली. दरम्यान कुटुंबियांनी त्याचे लग्न कोयलारी गावच्या तरुणीशी ठरवले होते. यानंतर लग्नाबाबत वाद झाला.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, केरिया गावच्या तरूणाने दोन तरुणींसह सात फेरे घेतले आहेत. तिन्ही कुटुंबांनी समाजातील ज्येष्ठांसह बैठक करून निर्णय घेतला आहे. तरुणाचे लग्न दोन्ही तरुणींशी करण्याचा निर्णय झाला, ज्यानुसार हे लग्न झाले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला आहे आणि या प्रकरणाची चौकशी करण्याविषयी बोलले जात आहे.

तहसीलदार घोडाडोंगरी मोनिका विश्वकर्मा म्हणतात की, एका तरुणाने दोन तरुणींसह एकत्र लग्न केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली असून, त्याविषयी कुटूंबियांची चौकशी केली गेली आहे. या प्रकरणात आम्ही पत्र लिहून पोलिसांना कळवू आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करतील.