महात्मा गांधींना पाकिस्तानचे ‘राष्ट्रपिता’ म्हणणे ‘भोवले’ ; अनिल सौमित्र यांचे भाजपातून निलंबन

मध्यप्रदेश वृत्‍तसंस्था : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा समाज माध्यमांवर पाकिस्तानचे राष्ट्रपिता असा उल्‍लेख करणारे मध्यप्रदेशातील भाजप नेते अनिल सौमित्रा आता चांगलेच गोत्यात आले आहेत. सौमित्रा यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. नथुराम गोडसे यांचा देशभक्‍त म्हणून उल्‍लेख केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. ते प्रकरण ताजे असतानाच सौमित्रांनी महात्मा गांधी यांचा उल्‍लेख पाकिस्तानचे राष्ट्रपिता असा केल्याने भाजपवर टिका होत आहे.

सौमित्र यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, परंतु पाकिस्तानचे असे म्हटले होते. तसेच भारतात त्यांच्यासारखे असंख्य पुत्र जन्माला आले. काही लायक आणि काही नालायक, अशी पोस्ट त्यांनी केली होती. त्या पोस्टवर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर भाजपने सौमित्र यांना पक्षातून निलंबित केले तसेच त्यांना आगामी ७ दिवसाच्या आत उत्‍तर देण्यास सांगितले आहे.