मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार संकटात, 6 मंत्र्यांसह 16 आमदार बंगळुरूमध्ये, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तात्काळ बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – होळीच्या माहोलमध्ये मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि १६ आमदार बंगळुरूमध्ये पोहोचले आहेत. हे आमदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटातील आहेत. एका वृत्तानुसार बंगळूरला पोहोचलेल्या या १६
आमदारांपैकी ६ आमदार हे मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आहेत. या दरम्यान भाजपाचे ६ आमदार देखील बंगळुरूमध्ये पोहोचले आहेत.

मध्यप्रदेशात काही दिवसांनीच राज्यसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. तसेच मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार हे अल्प बहुमताच्या आधारावर चालत आहे. दरम्यान मुख्यमंत्री कमलनाथ सहित अनेक नेत्यांनी आरोप केला होता की भाजपा त्यांच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एका वृत्तानुसार समजले की सीएम कमलनाथ यांनी आपला दिल्ली दौरा मधेच रद्द केला असून ते भोपाळला परत आले आहेत.

एका वृत्तवाहिनीच्या महिनीनुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सीएम यांनी भोपाळ येथे तातडीने एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत वरिष्ठ नेता दिग्विजय सिंह आणि अन्य नेते उपस्थित राहणार असून कमलनाथ यांना समर्थन करणारे अनेक आमदार देखील या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. कमलनाथ यांच्या जवळच्या सूत्रांकडून समजले की मध्यप्रदेशात सरकारला कुठलाही धोका नाही.