MP : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा केली सील

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. तसेच प्रशासनाकडून नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शेजारील मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेशची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, आमच्या शेजारी महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. आम्ही महाराष्ट्राची सीमा सील केली आहे. छत्तीसगढमधून येण्याजाण्यावरही निर्बंध घातले जातील, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केवळ मालवाहतूक, अत्यावश्यक सेवा आणि आपात्कालिन सेवांसाठी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. जर जिल्ह्यांमधील स्थिती बिकट झाली तर जिल्हाधिकारी हे लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतात. रविवारपासून कोणत्याही जिल्ह्याला लॉकडाऊन लावण्याची परवानगी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय मास्क परिधान न करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येईल. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स वाढवण्याचेही निर्देश चौहान यांनी दिले आहेत.