‘5 मुली झाल्या, पण ‘विकास’ अजून जन्मलाच नाही’, काँग्रेसच्या नेत्याचा केंद्र सरकारवर ‘निशाणा’

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचे संकट सुरु असताना एकमेकांवरील आरोपामुळे राळ उडत आहे. मध्य प्रदेशातील एका काँग्रेस नेत्याच्या ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या नेत्याने नोटबंदी, जीएसटीसह केंद्र सरकारच्या योजनांची थेट मुलींबरोबर तुलना केली. मुलासाठी म्हणजे ‘विकास’साठी या सर्व योजना देशावर लादण्यात आल्या असे ट्विट जीतू पटवारी यांनी केले होते.

लोकांना मुलाची अपेक्षा होती. पण पाच मुलींचा जन्म झाला. विकास अजूनही जन्मलेला नाही असे वादग्रस्त ट्विट जीतू पटवारी यांनी केले. जीतू पटवारी हे माजी शिक्षण मंत्री असून पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आहेत.जीतू पटवारी हे आमदार आहेत. ‘सबक साथ, सबका विकास’ या केंद्राच्या घोषवाक्यावर टीका करण्यासाठी म्हणून पटवारी यांनी हे ट्विट केले होते. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीच्यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘सबक साथ, सबका विकास’ ही घोषणा दिली होती. या ट्विटवरुन वाद झाल्यानंतर पटवारी यांनी दिलगिरी व्यक्त केली. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. मुली या देवीतुल्य आहेत असे पटवारी यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे.