युवकाने भरसभेत भाजप नेत्याला विचारला ‘हा’ प्रश्न ; नेत्याची बोलती बंद !

अलिराजपूर : वृत्तसंस्था – येथील जोबात विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार माधव सिंह दावर उमदा गावात निवडणूक प्रचारसभेत भाषण करत असताना एका युवकाने रोजगारावरुन भाजपा उमेदवार माधव सिंह दावर यांना प्रश्न विचारले. तुम्ही नोकऱ्या देणार म्हणून आश्वासन दिले होते. कुठे आहेत नोकऱ्या ? असा प्रश्न त्या युवकाने विचारला. ग्रामीण आणि आदिवासी युवकांच्या रोजगारासाठी इतक्या वर्षात तुम्ही काय केले ? दावर त्या युवकाच्या प्रश्नाला उत्तर देणार त्याआधीच त्याने समस्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत शेती आणि नोकऱ्या हे दोन प्रमुख मुद्दे आहेत.

भाजप उमेदवाराला प्रश्न विचारताना हा युवक म्हणाला, गावातील वेगवेगळया शाळांसाठी फक्त एकच शिक्षक आहे आणि हा शिक्षकही शिकवण्यासाठी फार इच्छुक नसतो. शिक्षणाची ही अशी परिस्थिती आहे. त्यानंतर या युवकाने बेरोजागारीच्या मुद्यावरुन दावर यांना जाब विचारला. यावेळी दावर निरूत्तर झाले. त्यांच्या समर्थकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एका युवकाने अशाप्रकारे भर सभेत उघडे पाडल्याने दावर यांना काय उत्तर द्यावे हेच सुचत नव्हते. अखेर दावर त्या युवकाला म्हणाले, तुला वाटत असेल तर मला मत दे, अन्यथा देऊ नको. ५६ वर्षीय माधव सिंह दावर यांना भाजपाने जोबात येथून चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. यापूर्वी ते २००३ आणि २०१३ मध्ये इथून निवडून आले आहेत. २००८ साली सुलोचना रावत यांनी माधव सिंह दावर यांना पराभूत केले होते.

काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला ; घटना सीसीटीव्हीत कैद