कर्जमाफी की थट्टा ; कुणाचे ५, तर कुणाचे १३ रुपये माफ

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे. कुणाचे पाच तर कुणाचे दहा रुपये माफ झाले असल्याची स्थिती मध्य प्रदेशात दिसत आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या ज्या याद्या लावण्यात आल्या आहेत. त्यावरून शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावासमोर ३० रुपये तर काहींच्या नावासमोर १०० रुपये माफ झाल्याचे दिसत आहेत. मात्र, या कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने आणलेल्या जय किसान कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, सरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना इंग्रजी वाचता येत नसल्याने कर्जमाफी झालेल्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

दरम्यान, बँकांकडे हिंदी सॉफ्टवेअर नसल्याने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीतून प्रसिद्ध केली, असा दावा बँक अधिकाऱ्यांनी केला आहे. कर्जमाफीच्या या गोंधळावर भाजपने जोरदार टीका केली आहे. हे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत आहे. याचे परिणाम काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असे भाजपने म्हटले आहे.