स्टँडअप कॉमेडियन फारुकीचा जामीन फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

इंदूर : वृत्तसंस्था – हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी मध्य प्रदेश (Madhya Pradesh ) हायकोर्टाने स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा जामीन अर्ज फेटाळला. या याचिकेवर आज (गुरुवार) सुनावणी झाली. देशात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे, असे मत मध्य प्रदेश हायकोर्टाने कोर्टाने नोंदवले आहे. फारुकीच्या जामीन अर्जावर 25 जानेवारीला सुनावणी झाली होती. परंतु कोर्टाने त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. आज कोर्टाने निर्णय देत याचिका फेटाळून लावली.

सोमवारी (दि.25) झालेल्या सुनाववणीवेळी अ‍ॅड. विवेक तन्खा यांनी मनुव्वर फारुकीची बाजू मांडली होती. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. सर्व धर्मांचा आदर करतो, असे फारुकीने म्हटले होते. पोलीस तपास आणि सुनावणी यात खूप वेळ जाईल. त्यामुळे जामीन देण्यात यावा, अशी विनंती त्याने केली होती.

याप्रकरणात सरकारी बाजू मांडताना, फारुकीविरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अन्य राज्यांत देखील गुन्हे दाखल आहेत. फारुकीच्या कृतीने सर्वसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने कोर्टात करण्यात आला होता.

फारुकीला 1 जानेवारीला झाली अटक

हिंदू देवी-देवता आणि भगवान राम -सीता, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली मुनव्वर फारुकीला इंदूर पोलिसांनी 1 जानेवारीला अटक केली होती. कॉमेडी शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी भाजप आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौडा यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड यांनी तक्रार दाखल केली आहे.