Coronavirus : प्रकृती बिघडत असताना देखील ड्यूटीवर हजर झाला पोलिस, कर्तव्य बजावताना कर्मचार्‍याचा मृत्यू

इंदौर : वृत्तसंस्था – प्रकृती खराब असल्याने घरी पाठवल्यानंतर देखील कोरोनामुळे शहराची बिघडत चाललेली अवस्था पाहून कर्त्यावर पुन्हा परतणाऱ्या एका कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. अबरार खान असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते इंदौर शहरातील परदेशीपुरा पोलीस ठाण्यात कर्यरत होते. अबरार खान यांना अस्थमा आणि रक्तदाबाचा त्रास होता. खान यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक विवेक शर्मा यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांनी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करुन घेण्याच निर्देश दिले. तसेच अबरार खान याला कोरोना झाला होता का याची देखील तपासणी केली जात आहे.

इंदौरच्या परदेशीपुरा पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलीस कॉस्टेबल अबरार खाना यांचा आज कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी खान यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र, एक दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा ड्युटीवर हजर झाले. रात्री उशीरा त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली मात्र, त्यांनी कर्तव्य महत्त्वाचे असल्याने गोळी खाऊन आज सकाळी पुन्हा ड्युटीवर हजर झाले. आज त्यांना मालवा मिल परिसरात तैनात करण्यात आले होते.
दोन जिवदान मिळाले पण तिसऱ्यावेळी

खान यांची प्रकृती ढासळल्याने त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. खान यांना यापूर्वी दोनदा जीवदान मिळाले होते मात्र, तिसऱ्या वेळी मृत्यूने त्यांना गाठले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस महासंचालक विवेक शर्मा यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर ते परदेशीपुरा पोलीस ठाण्यात गेले. याठिकाणी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:ची कळजी घेण्यास सांगून ते खान यांच्या परिवाराला भेटण्यासाठी गेले.

प्रश्न उपस्थित होत आहेत
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यापूर्वी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी आजारी असल्यास त्याला त्वरीत घरी राहण्याचा सल्ला देण्यात यावा. असे असूनही खान हे कर्तव्यावर हजर होते. त्यांना पोलीस ठाण्यात थांबण्यास सांगण्याऐवजी बाहेर तैनात करण्यात आले होते. खान यांना अस्थमा आहे आणि कोरोना अस्थमा असलेल्या रुग्णांना धोकादायक ठरू शकतो हे माहित असताना देखील खान यांना बाहेर तैनात करण्यात आले. याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.