देशातील सर्वात स्वच्छ शहरातील हॉटेल व ढाबे ‘या’ कारणासाठी जमीनदोस्त !

इंदौर : वृत्तसंस्था – गेली ४ वर्षे सलग देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून बहुमान मिळविलेल्या इंदौर महापालिकेने पाचव्या वर्षी हा पुरस्कार मिळविण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी स्वच्छता मोहिम अधिक कडक करण्यात आली आहे. या मोहिमेचा हातोडा हॉटेल व ढाब्यांना बसला आहे.

महापालिकेच्या हद्दीतील अवैध दारु विक्री करणारे हॉटेल आणि ढाबे यांच्यावर महापालिकेने हातोडा उगारला आहे. ही हॉटेल व ढाबे जेसीबीच्या सहाय्याने संपूर्णपणे उखडून टाकण्यात आली आहे़त.

इंदौर महापालिका आयुक्त प्रतिभा पाल यांनी सांगितले की, आम्ही महानगरपालिकेच्या अखत्यारीतील परिसरातील हॉटेल व ढाबे जमीनदोस्त केली आहेत. आणि ही मोहीम सुरु राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी अस्वच्छता करणार्‍या काही बेघरांना महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी इंदौर शहराबाहेर हाकलून दिले होते. त्यामुळे महापालिकेवर मोठी टिका झाली होती. त्यानंतर आता महापालिकेने कोणतेही अवैध कामे सुरु असल्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.