उपचारानंतर फी मागितली म्हणून डॉक्टरचीच बोटे कापली

छिंदवाडा: उपचारानंतर डॉक्टरने फी मागितल्याच्या कारणावरून संतापलेल्या रुग्णाने चक्क डॉक्टरांच्याच हाताची बोटं दातामध्ये पकडून तोडून टाकली. हि घटना मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे घडली आहे.पीडित डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून दोन युवकांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छिंदवाडा येथील कुंडीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिचरा बाजारमध्ये डॉक्टर एस. के बिंद्रा यांचे रुग्णालय आहे. शनिवारी रात्री १२ वाजता एक रूग्ण भाजलेला हात घेऊन उपचारासाठी बिंद्रा यांच्या रुग्णालयात पोहचला. रुग्णासोबत अन्य २ व्यक्तीही होते, जखमी रुग्णावर उपचार केल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी फीचे पैसे मागितले तेव्हा ते पैसे देण्यास नकार देण्यात आला. एवढेच नाही तर रुग्ण आणि त्याच्या साथीदारांनी रुग्णालयाची तोडफोड केली. हि माहिती समजताच डॉक्टर बिंद्रा संबंधित रुग्णाजवळ पोहोचले. दरम्यान, तेथे असणाऱ्या विजय तिवारी नावाच्या व्यक्तीने डॉक्टरांच्या हाताच्या बोटांचा चावा घेऊन ती वेगळी केली.

डॉक्टर एस के. बिंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १२ च्या सुमारास ३ व्यक्ती माझ्याकडे उपचारासाठी आले होते, त्यात विजय युइके, विजय तिवारी आणि तिसऱ्याचं नाव माहिती नाही, विजय युइकेने दारुच्या नशेत हातात जळती राख पकडली होती, त्यामुळे त्याचा हात भाजला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले.उपचारानंतर ज्यावेळी मागितले त्यावेळी फी देण्यास नकार दिला. त्यानंतर रुग्णाने मित्रांना बोलावले, यातील एक मित्र आला आणि हॉस्पिटलमध्ये अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. आमच्या हॉस्पिटलमधील सामानाची तोडफोड केली. तसेच त्या व्यक्तीने माझ्या डाव्या हाताची बोटं त्याच्या दातात दाबली आणि १५-२० सेकंदातच माझ्या बोटाचा वरचा भाग वेगळा केला. घडलेल्या प्रकारानंतर मी पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि जिल्हा रुग्णालयात आपल्या हातावर उपचार केले आहेत.

याबाबत छिंदवाडाचे एसपी संजीव उइके यांनी सांगितले की, उपचारानंतर फी मागितल्याच्या कारणावरून यावरून दोघांमध्ये भांडणं झाली, आकाश तिवारीने शिवीगाळ केली तर विजय तिवारीने डॉक्टरांच्या हाताचा चावा घेतला, या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून तिसऱ्याचा शोध सुरू असल्याचे उइके यांनी सांगितले.