आधी ‘होकार’, मग ‘नकार’, ‘त्या’ यू-टर्नमुळे काँग्रेसचं सरकार कोसळणार ?

भोपाळ : वृत्तसंस्था – ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपत प्रवेश केल्यानंतर मध्यप्रदेशात सत्ता नाट्याला सुरुवात झाली आहे. सिंधिया यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे राज्यातलं काँग्रेस सरकार अडचणीत सापडलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे आमदार भोपाळला परतण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.

सिंधिया यांचा 19 समर्थक आमदार बंगळुरूतल्या एका रिसॉर्टमध्ये आहेत. त्यांना मध्य प्रदेशात आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. आज हे आमदार भोपाळला परतण्यासाठी रिसॉर्टहून केम्पेगौडा विमानतळाच्या दिशेने निघाले होते. मात्र, तेथून ते पुन्हा रिसॉर्टवर परतले. या आमदारांना बंगळुरूहून आणण्यासाठी काँग्रेसने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, विमानतळावरूनच आमदार पुन्हा रिसॉर्टवर परतल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशात सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आमदारांना परत आणण्यासाठी भोपाळच्या राजा भोज विमानतळावर एक विशेष बसची व्यवस्था केली होती. मात्र, हे आमदार बंगळुरूच्या विमानतळावरून पुन्हा रिसॉर्टला परतल्याने ही बसदेखील रिकामी परतली. मध्य प्रदेशात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा या आमदारांनी केला. तशी माहिती त्यांनी मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालकांना कळवली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे दिले. सिंधिया यांच्या 19 समर्थक आमदारांनी बंगळूरूमध्ये तळ ठोकला असून ते मध्य प्रदेशात येण्यास तयार नाहीत. यातले सहाजण कमलनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत. परंतु त्यांच्यापैकी एकाचाही राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही.

You might also like