MP : 9 जिल्हे ‘कोरोना’मुक्त, आतापर्यंत 239 जणांचा मृत्यू

भोपाळ : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणादरम्यान मध्य प्रदेशामधून चांगली बातमी समोर येत आहे. मध्य प्रदेशामधील नऊ जिल्हे कोरोना मुक्त झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये बडवानी, आगर-मालवा, शाजापूर, श्योपुर, अलिराजपूर, हरदा, शहडोल, टीकमगड आणि बैतूल जिल्ह्यांचा समावेश आहे.

शुक्रवारी मध्य प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) मोहम्मद सुलेमान यांनी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. त्यात ते म्हणाले की, राज्यातील ५२ जिल्ह्यांपैकी ४४ जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरले आहे. ४५०० पेक्षा जास्त लोक याच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोना महामारीमुळे २३९ लोकांचा मृत्यूही झाला आहे.

चांगली गोष्ट म्हणजे ४४ पैकी ९ जिल्हे कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत. पूर्वी तिथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते, परंतु आता एकही केस नाही. या व्यतिरिक्त सुलेमान म्हणाले की, राज्यात आणखी आठ जिल्हे असेही आहेत जिथे आतापर्यंत कोविड-१९ चे अद्याप कोणतेही प्रकरण आढळलेले नाही.

राज्यात कोरोना विषाणूच्या तपासणीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी तपासणीसाठी किमान ५८२२ नमुने जमा करण्यात आले असून आतापर्यंत एकूण ९३,८४९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. सुलेमान यांनी सांगितले की, शुक्रवारपर्यंत राज्यात कोरोनाचे एकूण ४५९५ रुग्ण आढळले आहेत. यातील ४५ टक्के रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत.