मध्य प्रदेशात राजकीय संघर्ष सुरूच ! भाजप आमदार गुरूग्रामला तर काँग्रेसचे जयपूरला, ज्योतिरादित्य शिंदेंचा आज भाजपमध्ये प्रवेश

भोपाळ : वृत्तसंस्था – ज्योतिरादित्य शिंदे हे आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसच्या २२ आमदारांच्या राजिनाम्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार संकटात आले आहे. त्याचवेळी आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि भाजपकडून सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपने आपल्या १०६ आमदारांना गुरुग्राम येथे पाठविले आहे. तर काँग्रेसने आपले आमदार जयपूरला रवाना केले आहे.

बंगलुरु येथील हॉटेलमध्ये असलेल्या काँग्रेसमधील आमदारांनी आम्ही शिंदे यांच्याबरोबर आहोत. भाजपबरोबर नाही, असे सांगत वेगळी पार्टी बनविण्याची त्यांची मागणी आहे. काँग्रेसच्या नेत्या शोभा ओझा यांनी कमलनाथ सरकारला कोणताही धोका नसून बंगलुरु येथील आमदारही काँग्रेसच्या बरोबर असल्याचे सांगितले.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसने सिंधिया यांच्यावर ट्विटरद्वारे टिका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सिंधिया यांचे १८ वर्षाच्या राजकारणात काँग्रेसने त्यांना १७ वर्षे खासदार बनविले. २ वेळा केंद्रीय मंत्री बनविले. राष्ट्रीय महासचिव बनविले. उत्तर प्रदेशचे प्रभारी बनविले. कार्यसमितीचे सदस्य बनविले. निवडणुक प्रचार समितीचे प्रमुख बनविले. त्यांच्या ५० हून अधिक समर्थकांना तिकीट दिले. ९ मंत्री केले तरीही मोदी शहा यांना शरण गेले?. अशा शब्दात शिंदे यांच्यावर टिका केली आहे.