MP : दमोह बसस्थानकात 7 बसगाड्या जळून खाक

दमोह : मध्य प्रदेशातील दमोह बसस्थानकात उभ्या असलेल्या बसगाड्यांना अचानक आग लागून त्यात ७ बस जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

दमोह बस स्थानकात मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. बसस्थानकात रात्री बसगाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यातील एका बसला अचानक आग लागली. या आगीने शेजारी शेजारी लावलेल्या बसगाड्या एका पाठोपाठ पेटल्या. आगीची तीव्रता इतकी होती की, काही समजायच्या आत ७ ही बस जाळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही.
बस स्थानकाचे अधिकारी अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, आग विझविण्यात आली आहे. मात्र ही आग कशी लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. आगीचे कारण शोधण्यासाठी चौकशी केली जाईल.