काय सांगता ! होय, केवळ 35 मिनिटांमध्ये तिनं दिला तब्बल 6 मुलांना जन्म

शिपूर : वृत्तसंस्था – जुळी मुलं जन्माला आल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. मात्र,23 वर्षीय महिलेने तब्बल सहा बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशाच्या शिपूरमध्ये ही घटना घडली आहे. परंतु जन्मानंतर काही वेळाने सहा बाळांपैकी 5 बाळांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिपूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने 35 मिनिटांत सहा बाळांना जन्म दिला. मूर्ती सुमन असे 23 वर्षीय महिलेचे नाव असून प्रसूतीच्या कळा येऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिने सहा बाळांना जन्म दिला. मात्र सर्वच बाळांचे वजन कमी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पाच बाळांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, महिलेने चार मुलांना आणि दोन मुलींना जन्म दिला होता. सर्व बाळांचे वजन खूपच कमी होतं. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

काही महिन्यापूर्वी टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये एका महिलेने एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिल्याची घटना घडली होती. थेलमा चौका असे महिलेचे नाव असून तिने देखील चार मुलांना आणि दोन मुलींना जन्म दिला होता. ही महिला आणि तिची सहा बाळं सुरक्षीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं होते. जगात 4.7 अब्ज महिलांमध्ये अशी एखादीच महिला असते जी एकाचवेळी सहा मुलांना जन्म देते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.