धक्कादायक ! प्रेयसीला व्हॉटस्अ‍ॅपवर फाशीचे ‘प्रात्यक्षिक’ दाखविताना प्रियकराचा मृत्यू

दतिया : वृत्तसंस्था – गळ्याला फास कसा घ्यावा, हे व्हॉटस्अ‍ॅपवर प्रेयसीला दाखविण्याच्या प्रयत्नात प्रियकराचा तोल गेला आणि खरोखरच फास बसून त्याचा मृत्यू झाला. हितेश कुशवाह (वय २१) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. मध्यप्रदेशातील दतिया येथे सोमवारी हा प्रकार उघडकीस आला आहे.

हितेश त्याच्या मित्रांसोबत मोबाईल फोनवर गेम खेळत होता. त्याच्या मोबाईलवर फाशी घ्यायचे दोन व्हिडिओही सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, हितेश कुशवाह त्याच्या खोलीत प्लास्टिकच्या टाकीवर चढलेला होता. गळ्यात दुपट्ट्याने फास बनवून व्हॉटस्अ‍ॅपवर त्याच्या प्रेयसीला फाशी कशी घेतली जाते, हे तो दाखवीत होता. यादरम्यान त्याचा तोल गेला व पायाखालील प्लास्टिकची टाकी सरकून फास त्याच्या मृत्यूला कारण ठरला. सोमवारी सकाळी खोलीतून हितेश बाहेर आला नाही. तेव्हा हितेशच्या बहिणीने व कुटुंबियांनी दार वाजवले. आतून प्रतिसाद मिळाला नाही. खोलीत बघितले असता हितेशचा मृत्यू झाल्याचे त्यांना आढळले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.