MP : राज्य सभेसाठी मतदान करणारा भाजप आमदार ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

भोपाळ : वृत्तसंस्था – देशभरात काल राज्यसभेच्या 19 जागांवर मतदान घेण्यात आले. मध्य प्रदेशमध्येही राज्य सभेच्या तीन जागांवर मतदान झाले. ऐन कोरोना संकटात राज्यसभा निवडणूक घेतल्याने आता मध्य प्रदेशच्या आमदार आणि विधानसभेतील कर्मचाऱ्यांवर कोरोनाची टांगती तलवार आहे. मतदानासाठी आलेला भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

काल मध्य प्रदेशात तीन जागांवर मतदान झाले. या जागांवर भाजपचे दोन आणि काँग्रेसचे एक उमेदवार जिंकले. भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी हे राज्यसभेवर जाणार आहेत. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह हे राज्यसभेवर गेले आहेत. दरम्यान, या मतदानासाठी पटनामध्ये आलेले भाजपचे जावद मतदारसंघाचे आमदार ओमप्रकाश सकलेचा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या पत्निलाही कोरोनाची लागण झाली आहे.

सकलेच्या यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांच्या पत्नीला ताप आला होता. त्यामुळे त्यांनी दोघांचीही चाचणी भोपाळच्या एका खासगी लॅबमध्ये केली होती. या चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी रात्रीच पॉझिटिव्ह आला आहे. त्याच दिवशी राज्यसभेचे मतदान झाले. जावद विधानसभा मतदारसंघ नीमच जिल्ह्यात येतो. सकलेचा हे 16 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी भोपाळमध्ये आले होते.

सकलेचा यांच्यासह पत्नीला कोरोना झाल्याने मध्य प्रदेश सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी त्यांच्या संपर्कात कोणकोण आमदार, पक्षाचे पदाधिकारी आले होते, याचा शोध घेतला जात आहे. तसेच त्यांच्या आमदार निवासातील लोकांनाही तपासले जाणार आहे. विधानसभेतील कर्मचारी अधिकारी त्यांच्या संपर्कात आले होते का याचा शोध घेतला जाणार आहे.

सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश
सकलेचा यांचे जावदमध्ये निवासस्थान आधीपासूनच कंटेन्मेंट झोनमध्ये येते. कोरोनामुळे ते गेल्या काही दिवसांपासून दूर असलेल्या फार्महाऊसवर रहात होते. सकलेचा हे अनेक लोकांना भेटले होते. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही ते हजर होते. सकलेचा पॉझिटिव्ह आल्याचे समजताच सचिवालयाने राज्यसभा निवडणुकीवेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत.