बाबा रामदेव यांच्या Patanjali ला मोठा धक्का ! 10 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मद्रास हायकोर्टाने बाबा राम देव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्ययोग मंदिर ट्रस्टला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने हा दंड पतंजली आयुर्वेदच्या त्या दाव्यासाठी लावला आहे, ज्यात म्हटले गेले होते कि त्यांचे आयुर्वेदिक सूत्र ‘कोरोनिल’ कोरोना विषाणू बरा करू शकते. यापूर्वी मद्रास हायकोर्टाने कोरोना विषाणूच्या उपचारासाठी आणलेल्या ‘कोरोनिल’ औषधाचा ट्रेडमार्क वापरण्यास मनाई केली होती.

दंड ठोठाण्यासह उच्च न्यायालयाने म्हटले की, महामारीने घाबरलेल्या लोकांचा फायदा घेऊन कोरोनावरील उपचारांच्या नावाखाली सर्दी, खोकला, ताप यासाठी इम्युनिटी बूस्टरची विक्री करुन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होते. कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे की, या आपत्तीच्या काळात अशा अनेक संस्था आहेत, ज्या लोकांना निःस्वार्थीपणे मदत करत आहेत. अशा परिस्थितीत प्रतिवादीने त्या संस्थांना ही दंडाची रक्कम द्यावी.

दररोज कोरोनिलच्या १० लाख पॅकेटची मागणी
रामदेव यांनी बुधवारी दावा केला होता की, पतंजली आयुर्वेद कोरोनिलची मागणी पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. आतापर्यंत ते दररोज केवळ १ लाख पॅकेट्सचा पुरवठा करू शकत आहेत. ते म्हणाले की, सध्या दररोज कोरोनिलच्या १० लाख पॅकेट्सची मागणी होत आहे, पण आम्ही केवळ १ लाख पॅकेट्सचा पुरवठा करण्यास सक्षम आहोत.

रामदेव पुढे म्हणाले की, पंतजली आयुर्वेदने कोरोनिलची किंमत फक्त ५०० रुपये ठेवली आहे, पण जर आम्ही त्याची किंमत ५ हजार रुपये ठेवली असती, तर आज आम्ही सहजपणे ५ हजार कोटी रुपये कमावू शकलो असतो, पण आम्ही तसे केले नाही. चेन्नईस्थित Arudra Engineers Private Limited च्या याचिकेवर न्यायमूर्ती सी.व्ही. कार्तिकेयन यांनी ३० जुलै पर्यंत हा अंतरिम आदेश जारी केला होता. Arudra Engineers Private Limited ने दावा केला होता की, १९९३ पासून त्यांच्याकडे कोरोनिल ट्रेडमार्क आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, १९९३ मध्ये कोरोनिल-२१३ एसपीएल आणि कोरोनिल-९२ बी ची नोंदणी झाली होती. तेव्हापासून ते त्याचे नूतनीकरण करत आहेत.