माजी नगसेवक कैलास गिरवलेंसह तिघांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर उपविभागातील अमोल उर्फ संतोष ईश्‍वर पिंपळे ( वय २१) यांचा पोलिस कोठडीत मृत्‍यू झाला. कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५), सोमनाथ आसाराम ठोंबे ( वय ३३) यांचा न्‍यायालयीन कोठडीत व बाळू उर्फ शशीकांत अजिनाथ ससाणे यांचा ससून रुग्‍णालय, पुणे येथे उपचार दरम्‍यान मृत्‍यू झालेला आहे. या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूच्‍या कारणांची दंडाधिकारीय चौकशी करण्‍यासाठी उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहमदनगर यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.

मयत व्‍यक्‍तीच्‍या ज्‍या कोणास या घटनेसंबंधी माहिती, पुरावे आणि दंडाधिकारी चौकशीस उपयोगी पडेल, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहमदनगर यांच्‍याकडे दिनांक ६ ऑगस्‍ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता लेखी स्‍वरुपात देण्‍यात यावी. माहिती देणा-याने संपूर्ण नाव, वय व पुर्ण पत्‍ता मोबाईल क्रमांक व स्‍वतःची स्‍वाक्षरी करावी तसेच मृत्‍यू संबंधीच्‍या व दृश्‍याच्‍या बाबीचा सविस्‍तर मजकूर देण्‍यात यावा, असे नगर भागाचे उप विभागीय दंडाधिकारी उज्‍वला गाडेकर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

काय आहे प्रकरण

कैलास गिरवले यांना पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून चांगलेच वादळ उठले होते. पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. उत्तरीय तपासणी अहवालात गिरवले यांचा मृतदेह हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त