शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद निर्माण झाला होता मात्र मुंबईच्या महापौर बंगल्याचा पर्याय निवडण्यात आला. आता दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर स्मारकाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, जागेची निवड आणि विविध परवानग्यांची पूर्तता यामुळे काम पाच ते सहा वर्षे रखडले होते. त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याचा पर्याय समोर आला. त्यानंतर स्मारकासाठी महापौर बंगला रिकामा करण्यात आला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी भायखळा येथील राणीबागेतल्या बंगल्यात गृहप्रवेश केला.

असं असेल स्मारक
योजनेनुसार, स्मारकाच्या चहुबाजुंना पाणी असेल. बंगल्यासमोर एकमेव भूमिगत बांधकाम असेल. प्रवेशद्वाराची लांबी १.५ मीटर ने कमी करून १.२ मीटर करण्यात आली आहे. पण हेरिटेज समितीला प्रवेशद्वाराची उंचीदेखील कमी करून हवी आहे. स्मारकाचं नवं डिझाइन हेरिटेज आर्किटेक्ट आभा लांबा यांनी तयार केलं आहे.