महा मुव्ही चॅनलचे CEO संजय वर्मांना कॉपीराईटचं उल्लंघन केल्या प्रकरणी अटक !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  मुंबई पोलिसांनी कथित कॉपीराईटचं उल्लंघन केल्याप्रकरणी महा मुव्ही टेलिव्हिजन चॅनलचे सीईओ संजय वर्मा यांना मंगळवारी अटक केली. एका पोलीस अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली. ते एका कथित टीआरपी घोटाळ्यातील वॉन्टेड आरोपी आहेत. या प्रकरणाची माहिती देत अधिकाऱ्यानं सांगितलं की, मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजेंस युनिट (CIU) नं वर्मा यांना अटक केली.

चौकशी दरम्यान वर्मा यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, महा मुव्ही चॅनलनं 10 जून ते 10 नोव्हेंबर 2020 दरम्यान बेकायदेशीररित्या जंजीर, लावारिस, जादूगर, मोहब्बत के दुश्मन, मुकद्दर का सिकंदर अशा सिनेमांचं प्रसारण केलं. त्यांनी सांगितलं की, या सिनेमांचे कॉपीराईट्स पुनीत मेहराच्या कंपनीकडे आहेत जे प्रसिद्ध फिल्म निर्माते प्रकाश मेहरा यांचे चिरंजीव आहेत.

मेहरा यांनी कधीच या सिनेमांचे कॉपीराईट्स इतर कंपनी किंवा व्यक्तीला विकलेले नाहीत. या प्रकरणी आणखी 9 लोक वॉन्टेड असल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं. उल्लेखनीय आहे की, कथित टीआरपी प्रकरणात अलीकडेच दाखल केलेल्या एका आरोपपत्रात सांगितलं गेलं आहे की, हंसा रिसर्च एजन्सीच्या एका अधिकाऱ्यानं काही घरात महा मुव्ही, बॉक्स सिनेमा, फक्त मराठी आणि रिपब्लिक टीव्ही चॅनल पाहण्यासाठी पैसे दिले होते.