TET परीक्षेचा निकाल जाहीर ! 16 हजाराहून अधिक शिक्षक पदासाठी पात्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर केला आहे. 16 हजार 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. यंदा परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी असला तरी गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. परीक्षेचा निकाल www.mahatet.in या वेबसाईटवर घोषित करण्यात आला आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी 2019 परीक्षेचे आयोजन 19 जानेवारी 2020 रोजी करण्यात आले होते. परिषदेतर्फे इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी पेपर 1 तर सहावी ते आठवी गटासाठी पेपर 2 या पद्धतीने टीईटी परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 1 लाख 88 हजार 688 उमेदवारांनी पेपर 1 दिला. त्यातील 10487 उमेदवार पात्र ठरले. तसेच पेपर 2 देणाऱ्या 1 लाख 54 हजार 596 उमेदवारांपैकी 6105 उमेदवार पात्र ठरले आहेत. टीईटी निकालात आरक्षण, प्रवर्ग, वैकल्पिक विषय अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्याने येत्या 15 ऑगस्ट पर्यंत लॉगइन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी, असे परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळवले.

परीक्षेत झाल्या होत्या गंभीर चुका
राज्यात जवळपास 3 लाख 43 हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली होती. पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र रकाण्यामध्ये वेगळेच पर्याय देण्यात आले होते. तसेच वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र, वाक्याखाली अंडरलाईन करण्यात आलेलीच नव्हती. दोन्ही पेपरमध्ये शुद्ध लेखनाच्या गंभीर चुका होत्या. त्यामुळे विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली होती. विद्यार्थ्यांकडून आता या चुकीच्या प्रश्नांचे गुण आम्हाला देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.