‘महाविकास’चं नवं ‘मिशन’ ठरलं, उद्या पहिला महामेळावा होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला रोखण्यासाठी महाविकासआघाडीकडून मोठी घेराबंदी सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत देखील महाविकासआघाडी दिसणार आहे. सध्या नवी मुंबईत भाजपची सत्ता आहे. राज्यापाठोपाठ नवी मुंबईतही भाजपला झटका देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. उद्या शहरात महाविकासआघाडीचा पहिला मेळावा होणार असून या मेळाव्याला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत.

नवी मुंबईत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या तब्बल 48 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आली. आता पुन्हा महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी मोर्चा बांधणी सुरु झाली आहे. उद्या महाविकासआघाडीचा पहिला मेळावा शहरात होणार आहे. यात शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण, विश्वजीत कदम उपस्थित असतील. भाजपचा पराभव करण्याची महाविकासआघाडी जोरदार तयारी करत आहे.

नवी मुंबईतील नेते गणेश नाईक विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. मुलगा संदीप नाईक यांच्यासह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐरोली मतदार संघातून लढवून ते आमदारही झाले. 2015 साली अतिशय प्रतिकूल परिस्थितीही गणेश नाईक यांनी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता राखली होती. परंतु आता गणेश नाईक यांना महाविकासआघाडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता भाजप समोर पुन्हा मोठे आव्हान असेल.