‘महाविकास’आघाडीच्या मंत्रिमंडळात मित्र पक्षाला स्थान नाही, राजू शेट्टींना निमंत्रण नसल्याने चर्चांना ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडणार आहे. दुपार नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी आघाडीने आपल्या मित्रपक्षांना डावलल्याचे समजते. शपथविधी सोहळा दुपारी १ नंतर पार पडणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा मित्रपक्ष म्हणून काम करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या मंत्रिमंडळामध्ये स्थान तर नाहीच शिवाय माजी खासदार राजू शेट्टी यांना या सोहळ्यासाठी निमंत्रणही दिले नसल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या या सोहळ्यासाठी राजू शेट्टी हजेरी लावणार नसल्याचे समजते. आज शिवसेनेचे १३, राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे १२ आमदार आपल्या मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

शिवसेनेने मात्र आपल्याला पाठींबा देणाऱ्या बच्चू कडू यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने देखील आपली बरीचशी खाती निष्ठावान आणि जेष्ठ नेत्यांकडे सोपवल्याचे दिसून येते. मात्र अद्यापही गृह खाते आणि उपमुख्यमंत्री पदाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही.

आदित्य ठाकरेंना मिळणार मंत्रीपद ?

उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत राज्याचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवत शिवसेना आता बदलत असल्याचे संकेत दिले होते. मात्र ठाकरे मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांच्याकडे एखाद्या मंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/