देवेंद्र फडणवीसांमुळेच नागपुरात कोरोना आटोक्यात; या’ नेत्याचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नागपुरात ठाण मांडून बसले होते. त्यांनी तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकार राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असल्याने आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरावे लागत आहे, असेही दरेकर म्हणाले.

कांदिवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर व नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर दरेकर बोलत होते. ते म्हणाले, ‘ठाकरे सरकार कोरोनावर मात करण्यात कमी पडत आहे. रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्ये, जमिनीवर रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात येत आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत आहोत. महाविकास आघाडी सरकार राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे’.

तसेच नागपूरात कोरोनाच्या अशा परिस्थितीत नागपूरबरोबरच देवेंद्रजी मुंबईतही वेळ देतात. एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना फडणवीस यांच्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करत आहेत. जनतेला सुविधा उपलब्ध करून देत आहेत. अशीच मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपण कोरोनामुक्त करूयात, असेही दरेकर म्हणाले.