पुणे : अंदाजपत्रकात अजित पवारांचा फोटो न छापल्याने ‘मनपा’मध्ये ‘महाविकास’कडून निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केलेल्या 2020 – 2021 च्या अंदाजपत्रकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो प्रोटोकॉल नुसार न छापल्याने आज सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार निषेध नोंदविला.

अंदाजपत्रकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र छापले असून त्याखाली विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र छापले आहे. तर त्यानंतर दोन पाने सोडून अजित पवार यांचे छायाचित्र छापले आहे. रासने यांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी हा विषय उपस्थित करून स्थायी समिती अध्यक्षांचा निषेध नोंदवला. माजी महापौर प्रशांत जगताप, काँग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह सर्व विरोधी पक्ष नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेत, यापुढे सभागृहातच येणार नाही अशी भूमिका घेतली.

अखेर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र मागील पानावर छापन्यात कुठलाही उद्देश न्हवता. नजरचुकीने झाले आहे. प्रशासनाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचा फोटो एकाच पानावर छापावा. तसेच विधान परिषद सदस्य अनंतराव गाडगीळ, शरद रणपिसे यांच्या छायाचित्रांचाही पुस्तिकेत समावेश करावा असे आदेश दिले.