महाआघाडीच्या पत्रकार परिषदेला विखे पाटलांची दांडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाआघाडीची घोषणा करण्यात आली. मात्र या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. महाआघाडीचे सर्व नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते मात्र विखे पाटलांनी पाठ फिरवली.

विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. एव्हढेच नाही तर डॉ. सुजय यांना भाजपकडून उमेदवारी देखील देण्यात आली आहे. दरम्यान सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या जोरदार चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र विखे यांनी आपण काँग्रेससोबत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, शिर्डीत सेनेच्या उमेदवाराचाआणि नगरमध्ये आपल्या मुलाचा प्रचार करणार असं विखेंनी सांगितल्याचं सेनेच्या नेत्याने काल दावा केला होता. विखे पाटलांची नेमकी भूमिका आहे यावरून काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. त्यातच आज झालेल्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेला विखेंनी पाठ फिरवली आहे.

दरम्यान या महाआघाडीच्या या पत्रकार परिषदेला मुंबईचे शहर अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील अनुपस्थित होते. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हजर होते.