फसवणुक करणारी पुण्यातील महिला महाबळेश्वर पोलिसांच्या ‘जाळ्यात’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाबळेश्वर, वाई, पाचगणी येथील महिलांकडून लाखो रुपये उकळून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पुण्यातील महिलेला महिलांनी पकडून महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगल रवी मोरे (वय ४६, रा. विठ्ठलवाडी, जकातनाका, सिंहगड रोड) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंगल मोरे ही महिला सुमारे एक वर्षापूर्वी महाबळेश्वर येथे रहायला आली. नगरपालिका सोसायटीत तिने भाड्याने घर घेतले. तेथील महिलांची ओळख झाल्यानंतर तिने आपले पती पुण्यात सामाजिक काम करतात. पुण्यात अनेकांना शासकीय घरकुल योजना, आटाचक्की, शिलाई मशीन, भविष्य निर्वाह निधी अशा विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असल्याचे तिने सांगितले.

त्यानंतर महिलांचा विश्वास संपादन करुन प्रेरणा बचत गट स्थापन केला. या बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देण्याच्या नावाखाली तिने अनेकांकडून पैसे घेतले. महाबळेश्वर, वाई, पाचगणी, तापोळा अशा भागातील असंख्य नागरिकांकडून तिने लाखो रुपये उकळले. परंतु, कोणालाही या योजनांचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आता महिलांकडून पैसे परत देण्याची मागणी होऊ लागली.

शनिवारी तिला महिलांनी गाठले व परत पैशांची मागणी केली. तेव्हा तिने दवाखान्यात जाऊन येते, असे सांगून ती निघाली. हे समजताच काही महिलांनी तिच्या कारचालकाशी संपर्क साधला व ते कोठे आहेत, याची चौकशी केली. तेव्हा ते महाबळेश्वरमधून बाहेर पडत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला तेथेच थांबण्यास सांगितले. त्याचवेळी ही बाब पोलिसांना सांगण्यात आली. महिला तेथे पोहचल्यावर व त्यांनी मंगल मोरे हिला ताब्यात घेतले. पोलीसही तातडीने तेथे आल्यावर महिलांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.

Visit : Policenama.com