बारामतीच्या पालख्या वाहणार नाही, महादेव जानकरांनी गोपीनाथ गडावर सांगितलं

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही बारामतीची पालखी घेऊन मोठं होणार नाही, असा टोला रासपचे नेते महादेव जानकर अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला दिला आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यात बोलताना महादेव जानकर म्हणाले की, ‘आमच्या मनात खोट नाही. मी भाजपचा नाही पण आम्ही जोडलो, सत्तेत आलो ते मुंडे साहेबांमुळेच. आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपाशी जोडले गेलो आहोत. आम्ही बारामतीची पालखी घेऊन मोठं होणार नाही. आम्हाला दुसऱ्यांच्या दारी जाऊन मोठं व्हायचं नाही. मी केवळ माझ्या पक्षाचाच आहे.

माझा पक्ष यापुढेही भाजपासोबतच राहिल. यापुढे आम्हाला वेगळी वागणूक देऊ नका. पण तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्ही त्रास देता. आपला नेता मोठा व्हायचा असेल तर आपण आपल्या नेत्याचं स्वागत केलं पाहिजे. जय-परायज हा होतच असतो. परंतु सर्वांनी आपल्या नेत्याच्या पाठिशी कायम उभं राहायचं असतं. आम्ही भाजपाचे मित्र पक्ष घटकपक्ष आहोत. आम्हाला कोणी कितीही त्रास दिला तरी आम्ही कुठेही जाणार नाही.’

या मेळाव्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, भाजपाचे नेते प्रकाश महेता, हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसे, महादेव जानकर, पाशा पटेल उपस्थित होते. तसेच मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/