सुप्रिया सुळेंचे ‘ते’ वक्तव्य बालिशपणाचेच : महादेव जानकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काल वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा घेण्यात आली. या सभेत मोदींनी पवार कुटुंबावर टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींवर पलटवार केला. आजवर पवार कुटुंबीयावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, असं त्यांनी म्हटलं. त्यावर आज रासपचे महादेव जानकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेले वक्तव्य हे बालिश पणाचे आहे, असं जानकरांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पवार कुटुंबावर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याची काही गरज नाही. त्यांच्या कामातून त्यांना प्रसिद्धी मिळत आहे. तर सुप्रिया सुळे या संसदेत मागील दहा वर्षापासुन प्रतिनिधित्व करीत आहे. पंतप्रधानाबाबतची टीका पाहून सुप्रिया सुळे यांचे विधान म्हणजे बालिशपणा असल्याचे दिसून येते, असं जानकरांनी म्हटलं.

तसंच, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. तसेच मागील निवडणुकीत बारामती मतदारसंघातून लोकसभा लढविली. त्यादरम्यान थोड्या मतांनी माझा पराभव झाला. मात्र यंदा कांचन कूल बारामतीमधून लढत असल्याने मागील दहा वर्षात सुप्रिया सुळे यांची मतदार संघातील कामं पाहता यंदा त्यांचा पराभव निश्चित आहे, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, पुण्यातील भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन अर्ज भरला. त्यानंतर गिरीश बापट यांच्या पदयात्रेला सुरवात झाली. या पदयात्रेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, महादेव जानकर हे देखील सहभागी झाले आहेत.