विरोधकांनी मराठा-धनगर आरक्षणाचे राजकारण करू नये : महादेव जानकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील राजकारणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्याप्रमाणात चढउतार झाले. त्यावरून मराठा आरक्षणाबाबात न्यायालयाकडून निर्णय येणार आहे. त्यात मराठा आरक्षण टिकणार की नाही, तसंच धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. तसंच राज्यातील पावसाळी अधिवेशनात मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा विरोधकांनी छेडला होता. त्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी विरोधकांना आवाहन केले आहे. विरोधकांनी मराठा-धनगर आरक्षणाचे राजकारण करू नये, असं जानकर यांनी म्हटलं आहे.

आज मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाकडून सकारात्मक निर्णय होईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे सर्व समाजाला न्याय मिळेल. विरोधकांनी मराठा-धनगर आरक्षणाचे राजकारण करू नये.

आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. मात्र, त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र धनगर आरक्षणाबाबत ठोस पावले उचलली आहेत, असं जानकरांनी नमुद केले. तसंच आरक्षणाबाबत न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केल्याचेही त्यांनी सांगितलं.

धनगर आरक्षणाची सुरुवात आम्हीच केली आणि समाजाचे भलेही आम्हीच करणार, असं सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवर आग पाखड केली. राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षणाबाबत मोर्चा काढला होता. त्यावेळी समाजातील तरुणांचे जीव वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत आंदोलकांना भेटलो होतो. त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. मात्र, चळवळीत बोलणे वेगळे आणि संसदीय कार्यपद्धती वेगळी असल्याची जाणीव सत्तेत आल्यानंतर झाली, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, यावेळी जानकर यांनी धनगर समाजाला आश्वासन दिले आहे. मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाचे आरक्षण अडकून राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मात्र, सर्व अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानुसार आता टीसचा अहवाल मिळाला आहे. सरकारनेही न्यायालयात अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे भाजपच धनगर समाजाला आरक्षण देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.