‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखो करतो’ अशी सेना भाजपची सध्या रणनीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखो करतो’ अशी सेना भाजपची सध्या रणनीती आहे असे महादेव जानकर यांनी म्हणले आहे. काही झाले तर दोन्ही पक्ष युती केल्या शिवाय राहणार नाहीत असा दावा राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीवर महादेव जानकर यांनी केलेले विधान राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे.

भाजप आणि शिवसेनेत कितीही भांडणे झाली तरी त्यांची लोकसभेच्या निवडणुकीला युती होणार आहे आणि युती होत नाही असे दिसल्यास दोघांमध्ये युती घडवून आणण्यात मी पुढाकार घेईल असे महादेव जानकर यांनी म्हणले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुका आपण भाजप शिवसेने सोबत युती करून लढणार आहे. तर राज्याच्या बाहेर आमचा राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र निवडणुका लढणार आहे असे महादेव जानकर यांनी म्हणले आहे.

दरम्यान मुंबईत झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. शिवसेनेला पटकावणारा अजून जन्माला आलेला नाही असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या लातूर मध्ये केलेल्या विधानाचे उत्तर दिले आहे. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे रोजच भाजपवर आगपाखड करत आहेत.  यांच्या मनात युतीचा विचार आहे का नाही अशी धास्ती भाजपच्या नेत्यांना लागली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस रात्री १२ नंतर मुंबईच्या एका हॉटेलमध्ये युतीच्या चर्चा करतात असा  गौप्यस्फोट  महाड येथे घेतलेल्या राष्ट्रवादीच्या सभेत केला होता.

एकंदरच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघू लागले आहे. तर मध्यंतरी सूत्रांनी शिवसेना भाजप यांच्यात युतीचा फॉर्मुला ठरला असून आता फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे असे म्हणले होते. मात्र त्या दृष्टीने दोन्ही पक्ष घोषणा करत नाहीत अथवा त्या दृष्टीने हालचाली हि दिसत नाहीत. विरोधकांच्या टीकेचे धनी होण्याचे टाळता यावे म्हणून शिवसेना आणि भाजप आपल्यातील युती लवकर जाहीर करणार नाही असे हि बोलले जाते आहे.