चारा उपलब्ध होइपर्यंत चारा छावण्या चालुच राहणार : महादेव जानकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहाजीनगर (ता. इंदापूर) येथिल निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या जनावरांच्या चारा छावणीस गुरूवारी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली. भेटीदरम्यान आगामी काळात जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या सुरू राहतील, अशी ग्वाही पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी निरा- भिमा कारखाना येथे बोलताना दिली.

निरा-भिमा कारखाना कार्यस्थळावरील छावणीत सध्या एक हजार सातशे जनावरे आहेत. कारखान्याचे वतीने शहाजीनगर तसेच शिरसटवाडी व खोरोची येथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी मंत्री महोदयांना दिली. या भेटीत महादेव जानकर यांनी छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला व विचारपूस केली.

या छावणी भेटीनंतर मंत्री महादेव जानकर यांचा कारखान्यावरती अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना महादेव जानकर यांनी सांगितले की, मध्यंतरी शेतकऱ्यांना १५ किलो चारा दिला जात होता परंतु तो अपुरा पडत असल्याने सध्या १८ किलो चारा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भूमिहीन शेतकऱ्यांची जनावरे छावणीत दाखल करून घेणेसाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्याचा दाखला ग्राह्य धरण्याचा शासकीय आदेश लवकरच काढण्यात येईल. निरा-भिमा कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची उत्कृष्टपणे प्रगती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तात्कालिक संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव देशमुख व पतंगराव कदम यांनी मी आमदारकीची शपथ घेतलेनंतर विधिमंडळ कामकाजाबाबत मार्गदर्शन केल्याची आठवण याप्रसंगी बोलताना मंत्री महादेव जानकर यांनी नमूद केली.

मंगळवारी मुंबईत दिमाखात पार पडलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा विधानगाथा पुस्तक सोहळ्यास सर्व पक्षांची नेते मंडळी फक्त हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच एकत्र आली होती, असे गौरवोदगार यावेळी बोलताना मंत्री जानकर यांनी काढले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, धनंजय कोरटकर, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, दिलिपराव ढोले, सुरेश मेहेर, श्रीमंत ढोले, दादासाहेब केसकर, किरण गोफणे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –