महागणपती मुक्तद्वार यात्रा यावर्षी रद्द ! प्रशासनाकडून बंदोबस्त

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –   अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात भाद्रपद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो मात्र चालू वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महागणपती मंदिरातील सर्व धार्मिक उत्सव बंद करण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या अनुशंगाने गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रांजणगाव गणपती हे अष्टविनायकातील महत्वाचे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक आहे.
महागणपतीच्या मुक्तद्वार याञेच्या पहिल्या दिवशी पुर्वव्दार करडे येथील मांजराई (दोनलाई) देवी तर दुसऱ्या दिवशी दक्षिणव्दार निमगाव म्हाळुंगी येथील आसराई (शिरसाई) देवी तसेच तिसऱ्या दिवशी पश्चिमव्दार गणेगाव येथील ओझराई देवी, चौथ्या दिवशी उत्तरव्दार ढोक सांगवी येथील मुक्ताई देवी अशा चार दिवस चार देवीच्या मंदिरामध्ये पालखी जाते. हे स्वयंभु स्थान असल्यामुळे रांजणगाव येथे कोठेही गणेशमुर्ती बसविली जात नाही. एक गाव एक गणपती हे या ठिकाणी अनेक शतके आहे. महागणपतीच्या चार दिशांना श्री देवीची मंदिरे असुन भाद्रपद उत्सवात या ठिकाणी अनवाणी पायी व्दारयात्रा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे.परंतु शासनाने कोरोना महामारीमुळे धार्मिक कार्यक्रम व मंदिर उघडण्यास मनाई केलेली आहे.

रांजणगाव गणपती गावात आज पर्यंत कोरोनाचे ५० रुग्ण आढळून आले आहेत. यातील अनेक रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. माञ याञा काळात भाविक दर्शनाला येऊन गर्दी करु शकतात. या सर्व बाबींचा विचार करता महसूल प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरामध्ये गर्दी होणार नाही यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे या बंदोबस्ता साठी ५ पोलीस अधिकारी व ४० पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.