‘स्वार्थापोटी हे लोक एकत्र येतात, अन् स्वार्थ साधल्यानंतर हे आपल्या मार्गाने जातात’

कराड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तर्फे सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कराड येथे आज आघाडीची महासभा आहे. लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीत आहेत.

प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजेच प्रीती संगमला भेट दिली. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाआघाडीच्या सभेला सुरुवात झाली आहे.

या सभेत खासदार उदयनराजे भोसले यांनी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि शिवसेना-भाजपच्या युतीवर टीका केली. मागील लोकसभा निवडणुकांपुर्वी मोदी सरकारने १५ लाख रुपये देऊ, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, रोजगार दिला जाईल अशी आश्वासने बेंबीच्या देटापासून ओरडून दिली. मात्र जनता मोदी सरकारच्या या फसव्या आश्वासनांना फसली आहे, असं त्यांनी म्हटलं.

तसंच भाजप-सेनेच्या युतीवरही त्यांनी टीका केली. आपल्या स्वार्थापोटी हे लोक एकत्र येतात. आणि स्वार्थ साधल्यानंतर आपापल्या मार्गाने जातात. तसंच माध्यमांनी लोकांचे हित पाहावं. लोकापर्यंत परिस्थिती पोहचवली नाही तर देश देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. मी मीडियाला हात जोडतो की त्यांनी खरी परिस्थिती मांडावी. एकदा वेळ गेली की ती येत नाही. लोकांना साथ द्या, असं आवाहन त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, मला सगळ्यात जास्त पाठिंबा रामराजे निंबाळकरांचा आहे. मला कॉलेज जिवनापासून रामराजेंचा पाठिंबा आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये ‘एक बार अगर मैने कमिटमेंट करदी तो मै खुदकी भी नहीं सुनता’, अशी डायलॉगबाजी करत आपली कॉलर उडवली.