महाजन-दानवे पक्ष बुडविणारे राहू-केतू : आ.अनिल गोटे 

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – माझी आमदारकी धुळे शहराला लागलेले ‘ग्रहण’ असल्याचे रावसाहेब दानवे म्हणतात. मी ‘ग्रहण’ आहे की नाही, ते धुळेकर ठरवतील. पण, महाजन- दानवे हे पक्ष बुडविणारे राहू-केतू आहेत, हे जनतेला पक्के ठाऊक झाले आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा दर्जा राखणाऱ्या पक्षातील इतर नेत्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, याबाबत दानवेंनी आत्मपरीक्षण करावे आणि हिंमत असेल तर गिरीश महाजनांनी धुळ्यात एका व्यासपीठावर यावे, अशा शब्दात आ.अनिल गोटे यांनी जलसंपदा मंर्त्यांना आव्हान दिले आहे.

आ. गोटे यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठविली. यावेळी लोकसंग्रामचे तेजस गोटे, दिलीप साळुंखे, योगेश मुकुंदे, प्रशांत भदाणे आदी उपस्थित होते. आ.गोटे पुढे म्हणाले की, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष भामरे यांनी मतदान यंत्रांमध्ये फेरफार करुन धुळेकर जनतेची फसवणूक केली. याबाबत सर्व स्तरावर तक्रारी केल्या आहेत. धुळे पोलिस अधीक्षकांनी माझी तक्रार महापालिका निवडणुकीशी संबंधीत असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवून दिली आहे. पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊनदेखील अद्याप निर्णय झालेला नाही.

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रभारी म्हणून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी सोपविली किंवा त्यांनी स्वत: पदरात पाडून घेतली. तेथे मिळालेल्या यशाचा बुरखा टराटरा फाडून टाकला आहे. मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही, असे गोटे यांनी म्हटले.