मुख्यमंत्र्यांची ‛महाजनादेश’ यात्रा सभा उद्या दौंडच्या वरवंडमध्ये, कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ उद्या शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता दौंड तालुक्यात येत असून त्यांची जाहीर सभा ही वरवंड येथील बाजार मैदानात होणार आहे अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

दौंड तालुक्यामध्येच मुख्यमंत्र्यांनी सभा घेण्याचे नेमके कारण काय ? या पत्रकारांच्या प्रश्नावर आमदार राहुल कुल यांनी बोलताना आजपर्यंतच्या इतिहासात दौंड तालुक्यासाठी सर्वाधिक निधी देऊन माझ्या प्रयत्नांना खंबीर साथ देणारे कोणी असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मी त्यांना आवर्जून आपली दौंडमध्ये सभा व्हावी अशी विनंती संपूर्ण दौंडकरांच्या वतीने केली होती आणि त्यांनी दौंडकरांच्या या विनंतीस मान देऊन दौंडच्या वरवंडमध्ये सभेसाठी मान्यता दिली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचे हात अधिक बळकट करण्यासाठी व दौंड तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार मानण्यासाठी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केेले आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुक्यामध्ये सभा घेत असल्याने ते विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टिकेवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.