उरुळी कांचन येथे शनिवारी महाजनादेश यात्रेचे आगमन

उरुळी कांचन : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेचे आगमन उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शनिवारी (ता. १४) दुपारी साडेतीन वाजण्याचा सुमारास होणार असल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हवेली व शिरुर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाजनादेश यात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना आमदार पाचर्णे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी बारामतीहुन पुणे – सोलापूर महामार्गाने उरुळी कांचनमार्गे पुण्याकडे रवाना होणार आहे. ही यात्रा उरुळी कांचन येथे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दाखल होणार असून दुपारी चार वाजण्याचा सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली ) येथे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यामध्ये वीस हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीचे अजिंक्य कांचन, कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, उरुळी कांचनचे माजी उपसरपंच सुनिल कांचन, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जगताप, उरुळी कांचन शहाराध्यक्ष श्रीकांत कांचन, कमलेश काळभोर यावेळी उपस्थित होते.