‘महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची आहे की ‘महाविकास’ची ?’, काँग्रेसची थेट नाराजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सरकार काँग्रेसला विश्वासात घेत नाही असा नाराजीचा सूर काँग्रेस नेत्यांमधून निघत आहे. राज्यातील तीन पक्षांनी मिळून बनवलेल्या सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसला का डवलण्यात येतंय ? असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना पडला आहे. महाजॉब्स पोर्टलवरून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्विट करून महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची ? आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या समान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केला आहे.

या ट्विटसोबत तांबे यांनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे. यामध्ये एकाही काँग्रेस पक्षाच्या मंत्र्याचा फोटो लावण्यात आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये जवळपास 1 तास बैठक झाली, काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती. तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या चर्चेत जे काही ठरले होते त्यानुसार होताना दिसत नाही अशी नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच सध्या राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी जाहीरपणे सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.