महाकाली लेण्यांची एक इंचही जागा सरकारला विकू देणार नाही, प्रविण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

पोलीसनामा ऑनलाईनः ठाकरे सरकारने अंधेरी येथील महाकाली लेणी बिल्डरला विकण्याचा घाट घातला आहे. मात्र महाकाली लेण्याची एक इंचही जागा विकू देणार नाही, असा इशाराच विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांनी सरकारला दिला आहे.

सुमारे 2 हजार वर्षांपूर्वीच्या या लेणी व मंदिराचा टीडीआर बिल्डरला आंदण देण्याचा निर्धार ठाकरे सरकारने केला आहे. सरकारच्या बेकायदेशीर कृतीचा भाजपच्या वतीने दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाकाली लेणी येथे रविवारी (दि. 3) निषेध करण्यात आला. त्यावेळी दरेकर बोलत होते. यावेळी भाजपा नेते किरीट सोमैय्या हे देखील उपस्थित होते.

प्रविण दरेकर म्हणाले, ठाकरे सरकार मुंबई विकायला निघाले आहे. येथील स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष दयायला सरकारला वेळ नाही. पण येथील टीडीआरच्या माध्यमातून सुमारे 200 कोटी बिल्डरच्या घशात कसे जातील याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. आज गोरगरिबाला घर घेण्यात अडचणी आहेत. त्यांची काळजी नाही या सरकारला नाही, त्यांच्यासाठी विशेष काही करायचं नाही परंतू सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम सरकारकडून सुरु आहे.

सत्तेत आल्यापासून सरकार मराठी अस्मिता विसरली आहे. सरकराच्या संवेदना मेलेल्या आहेत. ठाकरे सरकारची भूमिका ही केवळ सत्ता टिकविणे हीच आहे. मात्र भाजपा नेहमी जनतेच्या पाठीशी आहे. म्हणूनच इथल्या नागरिकांवर अन्याय होत असताना आम्ही येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही, असेही दरेकर यावेळी म्हणाले.